नवी दिल्ली – माजी लोकसभा खासदार प्रभुनाथ सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बिहारमधील सारण जिल्ह्यात 1995 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी दोन जणांची हत्या केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, बिहारच्या महाराजगंजचे माजी खासदार प्रभुनाथ सिंह आणि बिहार सरकार यांनी दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये आणि जखमी पीडितेला प्रत्येकी पाच लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. अशा प्रकारच्या हत्येचे प्रकरण आम्ही या पूर्वी कधीही पाहिलेले नव्हते, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली आहे.
पाटणा उच्च न्यायालयाने प्रभुनाथ सिंह यांना निर्दोष ठरवले होते. तो निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. आमच्यापुढे आता आरोपीला शिक्षेच्या संबंधात फाशी किंवा जन्मठेप हे दोनच पर्याय आहेत असे न्यायालयाने आज नमूद केले.
त्यावेळी आरोपींच्या वकिलांनी फाशीची कठोर शिक्षा देण्याचे हे प्रकरण नाही, अशी विनंती न्यायालयापुढे केली त्यानंतर न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रभुनाथ सिंह हे सध्या 70 वर्षांचे आहेत.