महापालिकेतील पदाधिकारी निर्धास्त
नव्या सत्ता समीकरणाचा परिणाम
शहरातील राजकारण ढवळले
पिंपरी – राज्यात सत्तास्थापनेसंदर्भातील राजकीय घडामोडीचा थेट परिणाम पिंपरी-चिंचवड शहरात दिसून येत आहे. गेल्या काही काळात शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शनिवारी सकाळी जल्लोष करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये रविवारी मात्र अस्वस्थता दिसून आली, तर महापालिकेतील भाजपाचे पदाधिकारी मात्र निर्धास्त झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर 2017 पूर्वी राष्ट्रवादीची पर्यायाने अजित पवार यांची एकहाती सत्ता होती. मात्र सन 2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महापालिकेची सत्ता काबिज केली. गेल्या अडीच वर्षांत हजारो कोटींची कामे काढताना अनेक निर्णय मनमानी पद्धतीने घेण्यात आले. या निर्णयाविरोधात अनेकांनी राज्य शासनाकडे तक्रारी केल्या; मात्र राज्यातही भाजपाचीच सत्ता असल्यामुळे त्याची दखल घेतली गेली नाही. मात्र शुक्रवारपर्यंत राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसचे सरकार येणार हे निश्चित झाल्यानंतर पालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.
अजित पवार यांना पालिकेचा खडान्खडा माहिती असल्यामुळे अनेक कामांची चौकशी लागेल, अशी भीती अनेकांनी खासगीत बोलून दाखविली होती. मात्र अचानकपणे अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पदाधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला. तर शनिवारी भाजपाच्या पक्षातील कार्यकर्ते व नगरसेवकांनी सत्ता आल्यानंतर आनंद व्यक्त केला. शनिवारी दिवसभराच्या आणि रविवारी दिवसभराच्या घटनाक्रमानंतर मात्र अजित पवार यांच्या पाठीशी पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे समोर आल्यामुळे या पदाधिकाऱ्यांची चिंता वाढल्याचे आज दिसून आले.
वरिष्ठ नेते काहीतरी करतील आणि सत्ता टिकेल, बहुमत सिद्ध होईल, इतकीच आशा या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. तर पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी मात्र निर्धास्त भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी आता अजित पवारांच्या परतीचे दोर कापू शकते, अपेक्षित ताकद त्यांच्याकडे राहणार नाही. तसेच भाजपाचे सरकार टिकले तरी पालिकेतील कामांची चौकशी होणार नसल्याने या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनधास्तपणा अधिक दिसून आला. “वेट ऍण्ड वॉच’ची भूमिका काही जणांनी बोलून दाखविल्यामुळे शहरात भाजपात एका बाजूला अस्वस्थता, तर दुसऱ्या बाजूला निर्धास्तपणा असे दुहेरी चित्र रविवारी दिवसभर पहावयास मिळाले.