मुंबई : दिवाळीच्या अगोदरपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. दिवसेंदिवस या संपाची तीव्रता चिघळत असल्याचे दिसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सरकारसोबत एसटीच्या संघटनांच्या प्रमुखांच्या चर्चा सुरु आहेत. मात्र यावर कोणताही तोडगाच निघत नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुंबईत ३-४ संपकरी महिला कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
मुंबईत आंदोलनकर्त्या महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी या महिलांना वेळीच रोखल्याने पुढचा अनर्थ टळला. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. गेल्या आठ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू आहे.
कामगारांच्या प्रश्नावर काहीच तोडगा निघत नसल्याने आंदोलनकर्त्यांची उद्विग्नता वाढत चालली आहे. एसटी संपाचा आज आठवा दिवस आहे. आपल्या मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे.
मागच्या आठ दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र अद्याप काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे राज्यातील आंदोलन आणखीन चिघळत चालले आहे.