खालापूर – महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठोबा देवस्थान ताकई येथे कार्तिकी एकादशी दिवशी विठूरायाच्या गजराने दुमदुमून गेली. पुढील पंधरा दिवस यात्रा सुरू राहणार आहे.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलाच्या गजरात भक्तांची पाऊले कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाकटी पंढरी ताकईकडे चालू लागतात. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज याठिकाणी मिरचीचा व्यापार करण्यासाठी येत असत. येथे पांडूरंगाचा धावा केल्यानंतर तुकाराम महाराज यांना साक्षात पांडूरंगाने दर्शन दिले.
कार्तिक एकादशीच्या आदल्या दिवशी ताकई गावात पांडूरंगाच्या पादुका व मुकुटाची पालखीचा मान गावातील कै. गणपती संभू पाटील व कै. लक्ष्मण संभू पाटील यांच्या कुटुंबाला मिळाला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा होनाड ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रकाश पाटील यांचे जावई विशाल मनोहर थोरवे व मुलगी विनया विशाल थोरवे यांच्या हस्ते झाली.
यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष सुधीर पाटील, सुनिल पाटील, कृष्णा पाटील, मारूती पाटील उपस्थित होते. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. पंधरा दिवस एकादशीचा समारोह होईपर्यंत दररोज किर्तन होणार आहेत.