वाघोली – तालुका हवेली येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न तसेच वाघोलीकरांचे इतर मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त व पीएमआरडीए आयुक्त यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करून प्रश्न सोडवणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी भाजप नेते राहुल कुल व गणेश बिडकर यांची भेट घेऊन वाघोलीतील विविध प्रश्नांनाबाबत दोन्ही आयुक्तांच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याची मागणी केली. दौंड व हवेली तालुका यांच्या आर्थिक उत्पन्नाच्या श्रोतांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वाघोलीमध्ये होणारी वाहतूक कोंडी दोन्ही तालुक्यांची डोकेदुखी वाढवणारी आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आमदार राहुल कुल यांनी वाघोली ते राहू रस्ता तसेच वाघोलीमध्ये बायपास रस्ता याबाबत शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याची दखल शासनाने घेतल्याने वाघोलीतील वाहतूक कोंडी दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करून वाघोलीमधील नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत पुणे मनपा प्रशासनासोबत वाघोली मधील स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या बैठकीतून अनेक विकासाचे प्रश्न सोडवले गेल्याने आगामी काळात राहुल कुल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीने वाघोलीच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याची भावना माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी व्यक्त केली आहे.