मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत या जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पवारांना धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या दोन्ही धमकी प्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधी पक्ष राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि गृह विभागावर टीका करत असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी परंपरा आहे. आमचे राजकीय पातळीवर मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर कोणतेही मनभेद नाहीत. सोशल मीडियावर व्यक्त होत असताना कोणत्याही नेत्याला धमकावणं किंवा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणं ही बाब खपवून घेतली जाणार नाही. दरम्यान, अशा प्रकरणात पोलीस नक्कीच कायदेशीर कारवाई करतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शरद पवारांना आलेल्या धमकीसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. “गृहमंत्रालयाने याची नोंद घ्यावी. मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना यासंदर्भात माहिती दिली आहे. शरद पवारांना ज्या पद्धतीने ही धमकी आली आहे. ते दुर्दैवी आहे”, असं सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांना म्हणाल्या आहेत.
धमकी देणाऱ्या ट्वीटमध्ये शरद पवारांना शिवीगाळ करून पुढे “तुमचाही दाभोलकर होणार”, असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.