सिंधुदुर्ग: भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांचं ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन झाले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झाले आहे. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
राणे हे महाराष्ट्राचे दबंग नेते आहेत. झोप विसरून ते मेहनत करतात. आज मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने त्यांची स्वप्नपूर्ती होत आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचं कौतुक केलं. अनेक लोकं स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणं हे सोपं असतं. पण स्वप्न पाहिल्यानंतर आपली झोप विसरून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात, असे लोक कमी असतात. त्यामधील नारायण राणे हे एक. सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारणं हा फार धाडसी निर्णय होता. 650 खाटांचे हॉस्पिटल उभारणं हे खूप आव्हानात्मक आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मेडिकल कॉलेज उभारताना अनेक अडचणी आल्या. इतके इन्स्पेक्शन होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या तरतूदी असतात. इतकी गुंतवणूक केल्यानंतर वर्ष-दोन वर्ष वाट पाहावी लागते. या सगळ्या गोष्टींना सामोरे जात त्यांनी सगळा पाठपुरावा केला. अखेर या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं. या स्वप्नपूर्तीचा आनंद राणेंच्या चेहऱ्यावर दिसतोय, असंही फडणवीस यांनी म्हटले.