कराड ( प्रतिनिधी ) – वहागावच्या (ता. कराड)हद्दीत आशियाई महामार्गावर स्विफ्ट डिझायर कारचा (MH 07 AB 5610 ) भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण ठार झाले असून, कारचा चक्काचूर झाला. हा अपघात आज रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास झाला.
कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना वहागाव याठिकाणी आल्यावर भरधाव वेगातील कारचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी सरळ दुभाजक ओलांडून पुण्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या अज्ञात वाहनाला मध्यभागी जोरदार धडकली. या धडकेत कारमधील पाच जणांपैकी तीन जण जागीच ठार झाले. तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याला कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, पंचनामा सुरू आहे.
अपघातातील मृतांची नावे तसेच वाहनांबद्दलचा तपशील समजलेला नाही.