Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडले आहे. यानंतर आता येत्या 26 एप्रिल रोजी शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानुसार आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील जाहीर प्रचाराची मुदत आज बुधवारी संपणार आहे.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शाह, राहुल गांधी यांच्यासह राज्यातील इतर नेत्यांनीही प्रचारसभांचा धडाका लावला आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यांतील एकूण 88 जागांसाठी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेत छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, आसाम, बिहार, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरचा समावेश आहे.
यात महाराष्ट्रातील एकुण आठ लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी अशा आठ लोकसभा मतदारसंघासाठी 28 एप्रिल रोजी मतदान होत आहे. आज येथील प्रचार संपणार असल्याने येथील आजचा दिवस कार्यकर्ते आणि उमेदवारांसाठी महत्त्वाचा असणार आहे. Lok Sabha Election 2024|
राहुल गांधी यांची सोलापूर आणि अमरावतीत सभा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या अमरावती आणि सोलापूर येथे सभा होतील. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ राहुल यांची पहिली सभा परतवाडा येथील भारत जोडो यात्रा मैदानात होईल. त्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी मरीआई चौकातील एक्झिबिशन मैदानात राहुल सभा घेतील. ही सभा दुपारी चारच्या दरम्यान होणार आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांची सभा Lok Sabha Election 2024|
वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस विरुद्ध एनसीपी शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यात लढत होणार आहे. तडस यांच्या प्रचारार्थ आज वर्धा लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभा होणार आहे. दुपारी 12 वाजता पुलगाव येथे तर 4 वाजता वर्धेत सभा होणार आहे.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या आहेत. शरद पवार यांनीही वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्यासाठी सभा घेतली.
अमित शाह यांची अमरावतीत सभा
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अकोला येथे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्यासाठी मंगळवारी अकोला येथे सभा घेतली. अकोल्यात वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, भाजपचे अनुप धोत्रे आणि कॉंग्रेसचे अभय पाटील अशी लढत असणार आहे.
त्यानंतर आज ते अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. अमरावती मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखडे तसेच प्रहारचे दिनेश बुब आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात लढत असेल. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अमरावती येथील सायन्स कोअर मैदानात सभा होणार आहे.
अमरावतीत बच्चू कडू यांचा राडा
अमरावतीमधील सभेच्या मैदानावरून प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू आणि पोलिस प्रशासनात मंगळवारी जोरदार वाद झाल्याने तेथील राजकीय वातावरण तापले आहे. पोलिस प्रशासनाने कडू यांना त्यांचे उमेदवार दिनेश बूब यांच्या प्रचारासाठी सायन्स कोर मैदानात सभा घेण्यास परवानगी दिली होती. मात्र, अमित शहा यांच्यासाठी ही परवानगी रद्द करण्यात आल्याने कडू आणि पोलिस अधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावरून बच्चू कडू यांनी पोलिस अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर बच्चू कडू यांनी माघार घेतली.
यवतमाळ – वाशीम मतदारसंघात राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख लढत
यवतमाळ – वाशीम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्यात लढत हाेत आहे तर बसपाकडून हरिभाऊ राठोड रिंगणात आहेत. तर हिंगोली लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कदम, महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बी. डी. चव्हाण यांच्यामध्ये अटीतटीचा सामना होताना दिसणार आहे.
परभणीत महादेव जानकर, संजय जाधव आणि पंजाब डख यांच्यात मुख्य लढत होणार आणि नांदेड येथे विद्यमान भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर आणि आणि कॉंग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांच्यात थेट लढत आहे. चिखलीकर यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी येथे सभा घेतली होती. तर कॉंग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली आहे.
हेही वाचा:
‘काँग्रेस पक्षाचा पर्दाफाश झाला आहे’, वारसा कराच्या विधानावर अमित शाह भडकले