पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवार (दि. 16) सकाळीच आमदार जगताप यांची रुग्णालयात जावून भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर प्रवक्ते योगेश बहल, आमदार जगताप यांचे ज्येष्ठ बंधू विजय जगताप उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार जगताप यांच्या प्रकृती संदर्भात आणि उपचाराबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. तसेच त्यांचे बंधू शंकर जगताप यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत धीर दिला. काही मदत लागल्यास सांगावे, असेही पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी आणि भूमीपूजन शनिवारी शहर दौऱ्यावर येणार होते. मात्र, कालच उपमुख्यमंत्री पवार यांचा शहर दौरा रद्द झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. त्यामुळे पवार आणि जगताप कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.