जळोची -विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या हेतूने बारामतीतील अनेक खाजगी शाळांनी टाळेबंदीचे नियम पाळत ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. अशाच प्रकारे जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या सरकारी शाळांमध्ये शिकत असणाऱ्या गोरगरीब मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी नगरपालिकेच्या शाळांनी ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा अवलंब केला आहे.
बारामती नगरपालिका क्षेत्रात मराठी माध्यमांसह इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या मिळून 10 शाळांचा समावेश आहे. या शाळांमधून बारामती शहरातील गोरगरीब व हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबीयांतील 3 हजार 253 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू करण्याबाबत शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत या विद्यार्थ्यांना व्हॉट्सऍप ग्रुपद्वारे यावर्षीचा अभ्यासक्रम शिकवला जाणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितले.
मात्र असे असले तरी नगरपालिकेच्या शाळेत शिकणारी मुले ही बहुतांश आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेली गोरगरीब हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबातील आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन नाहीत.
ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाही अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा संभव आहे. त्यामुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची प्रशासनाने वेळीच दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी पालकांकडून मागणी होत आहे.
शासनाचा आदेश येईपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत; मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हॉट्स-ऍप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या ग्रुपद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न चालूू आहे.
-पी. एस. दिंडे,
प्रशासन अधिकारी बारामती नगरपालिका
मी रोजंदारीवर कामावर जातो. रोज काम केल्यावरच माझ्या घरातील चूल पेटते. अशा परिस्थितीत मुलांना मोबाइल घेऊन द्यायला पैसे आणायचे कुठून? मोबाइल नसेल तर मुलांना शिक्षण द्यायचे कसे, असा प्रश्न पडला आहे.
– शहाजी काळे, पालक बारामती