नगर -जिल्ह्यात आज आणखी 3 करोना बाधितांची भर पडली. त्यामध्ये नगर शहरातील बोल्हेगाव फाटा, राहाता व शेवगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
नगर शहरातील एकासह जिल्ह्यातील सात जणांनी करोनावर मात केली आहे. या सात जणांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आज 31 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 31 अहवालांची प्रतीक्षा नगरकरांना आहे. जिल्ह्यातील करोनातून बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 213 झाली असून, सध्या 34 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.
यामध्ये संगमनेर येथील चार, राहाता दोन आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश. तसेच राहाता शहरात करोनाबाधितांची संख्या आतापर्यंत आठ आहे. यात एकाचा खासगी रुग्णालयातील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. काल राहाता येथील 27 जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हे सर्व रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे.जिल्ह्यात आज अखेर करोनाबाधितांची संख्या 261 पोहचली आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित परिसर सील केला आहे. तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.