‘आमची साथ 80 वर्षांच्या योद्ध्यासोबत’ असे झळकले होते पोस्टर
बारामती – राष्ट्रवादीच्या कळपातून बाहेर पडून भाजपसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अजित पवार यांनी घेतली त्यानंतर बारामतीकरांना आश्चर्याचा धक्का बसला. अजित पवार उपमुख्यमंत्री होऊन देखील बारामतीकरांनी शांत राहणे पसंत केलं. कोणत्याही प्रकारचा जल्लोष बारामतीत झाला नाही. अजित पवारांच्या निर्णयामुळे संभ्रमावस्थेत असलेल्या कार्यकर्त्यांनी मात्र, शरद पवार यांनाच साथ देण्याची भूमिका घेतल्याचे चित्र बारामतीत होते. “आमची साथ 80 वर्षांच्या योद्ध्यासोबत’अशा प्रकारचे पोस्टर शहरातील तीन हत्ती चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावली आहे. मात्र, नंतर हे पोस्टर काढून टाकण्यात आले.
अजित पवार यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. असे असले तरी देखील एकीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तर दुसरीकडे दुसरे नेते अजित पवार यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे बारामतीकरांनी मात्र “वेट अँड वॉच’ अशीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे बारामतीत न जल्लोष न दुःख असेच काहीसे वातावरण आहे. दरम्यान, भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी बारामती येथे भाजपच्या विजयाच्या घोषणा दिल्या आहेत.
शहरातील तीन हत्ती चौकात फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाच्या पोस्टर भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात सन्नाटा असला तरी देखील बारामतीत भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.