अमोल मतकर
संगमनेर पोलिसांना पाच डिव्हाईस मशिन उपलब्ध
संगमनेर – वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंडाची पावती आता ऑनलाईन मिळणार आहे. वाहतूक पोलिसांना प्रशासनाने डिव्हाईस मशीन दिले आहे. संगमनेरातील वाहतूक पोलिसांना पाच डिव्हाईस मशीन मिळाली आहेत. या मशीनमुळे पेपरलेस कामकाज होत आहे. सध्या संगमनेर शहरात दररोज सरासरी 7 ते 10 हजारांची वसुली या डिव्हाईसमुळे होऊ लागली आहे.
संगमनेरमध्ये स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यरत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांच्या नेतृत्वाखाली 17 कर्मचारी आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनचालकांना दंडाची पावती देत होते. गेल्या तीन महिन्यांपूर्वी प्रशासनाने वाहतूक पोलिसांना डिव्हाईस मशीन दिल्या आहेत. या मशीनमुळे वाहनधारकांचे ऑनलाईन चलन केले जाणार आहे.
या मशीनवर वाहनाचा क्रमांक टाकल्यावर त्या गाडीला महाराष्ट्रातील कोणत्या सिटीत दंड झाला आहे हे समजते. तसेच कोणत्या गावामध्ये गाडीचा दंड प्रलंबित आहे हे समजते. या डिव्हाईस मशीनमध्ये डेटा स्टोर होत असल्यामुळे वाहतूक पोलिसांचे काम सोपे झाले आहे. संगमनेरातील वाहतूक शाखेला एकूण पाच डिव्हाईस मशीन मिळाल्या आहेत.
याआधी पोलीस नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी हातात पुस्तके घेऊन असायचे. आता त्यांच्या हाती ई-चलन मशीन आल्या आहेत. या नवीन प्रणालीमुळे नियम मोडून वाहने चालविणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ई-चलन मशीनमुळे कोणत्याही वाहन चालकाने राज्यात कोठेही नियमभंग केल्याने त्याला दंड झालेला असेल, दंड भरलेला नसेल, त्याला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने कितीवेळा दंड भरावा लागला, याची माहिती एका क्लीकवर या मशीनवर मिळणार आहे.