देहूरोड – मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड अप्पर तहसीलदार यांना दिलेल्या आदेशान्वये तहसीलदारांनी संबंधित मंडल अधिकाऱ्यांना तलाठी कार्यालयात शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने देहू तलाठी कार्यालयामध्ये सोमवारी (दि. ५ ) तर मामुर्डी, किवळे (दि. ६). किन्हई (दि. ७)चिंचोली (दि. ८) आणि रावेत (दि. ९) मौजेसाठी देहूरोड तलाठी कार्यालयामध्ये मंगळवार ते शुक्रवार दरम्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अपर मुख्य सचिव (महसूल) यांचेकडील पत्र दि. १८ जानेवारी २०२४ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार ज्या व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा नोंदी आढळून आलेल्या आहेत. त्या संबंधित नागरीकांना निदर्शनास येण्याच्या अनुषंगाने त्यांच्या याद्या सर्व तलाठ्यांमार्फत गाव स्तरावर मोहिम स्वरुपात प्रसिध्द करणेत आलेल्या आहेत.
त्यास अनुसरुन आढळून आलेल्या कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी मराठा नोंदीच्या आधारे पात्र व्यक्तींना नियमानुसार जात प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्देश देणेत आलेले आहेत. या निर्देशाच्या अनुषंगाने अपर तहसिल पिंपरी चिंचवड यांनी मंडल निहाय जात प्रमाणपत्र प्रस्ताव प्राप्त करुन घेण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत.
देवनगरी व मोडी लिपीतील देहू येथे २९३ तर किन्हई ६२३, चिंचोली १४७, किवळे १०८, मामुर्डी १०, रावेत ४२ नागरिकांचे कुणबी आढळून आले आहे. संबंधित व्यक्तींच्या याद्या वेबसाईटवर व तलाठी कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यांच्या वंशावळवरून संबंधित व्यक्तींची नोंद घेऊन शिबिरामध्ये जात प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन तलाठी सूर्यकांत काळे, रश्मी गलपिल्ले यांनी केले आहे.
कुणबी दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे
१. मुलांचे शाळा सोडल्याचा दाखला/जन्म दाखला/बोनाफाईड व आधार कार्ड
२. वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला व आधार कार्ड
३. आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला व मृत्युचा दाखला
४. पंजोबांचा मृत्युचा दाखला
५. गाव नमुना १४ व वारस फेरफार
६. जुने सातबारे
७. वंशावळ
८. मंडळ अधिकारी यांचा चौकशी अहवाल.