नवी दिल्ली – करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच अतिशय घातक समजला जाणारा डेल्टा व्हेरिएंट जगभरातील 135 देशांमध्ये सापडला असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. जगभरात करोनाच्या साथीच्या रुग्णांची संख्या पुढील आठवड्यापर्यंत 20 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
जगभरातील करोना रुग्णांची संख्या गेल्या महिन्यापासूनच वेगाने वाढते आहे. गेल्या आठवड्यात म्हणजे 26 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान तब्बल 40 लाख रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जगभरात झालेल्या करोना बळींचे प्रमाण 8 टक्क्यांनी घटले आहे. या आठवड्यात जगभरात 64 हजार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आता जगभरातील करोना रुग्णांची संख्या 1 कोटी 970 लाख इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 42 लाख जणांचा मृत्यू झाला आहे.
रुग्ण वाढीचे हे प्रमाण प्रामुख्याने पूर्व मध्यपूर्वेत आणि पाश्चिम प्रशांत क्षेत्रात जास्त आहे. या दोन्ही भागांमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण गेल्या आठवड्याच्या तुलनेत अनुक्रमे 37 आणि 33 टक्के इतके आहे. दक्षिण पूर्व आशियातील रुग्णवाढीचे प्रमाण 9 टक्के इतके आहे. जर याच वेगाने रुग्णवाढ सुरूच राहिली तर पुढील आटवड्यात जगभरातील रुग्णांची संख्या 2 कोटीपर्यंत पोहोचेल, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
संख्येच्बाबतील गेल्या आठवड्यात अमेरिकेत सर्वाधिक 9 टक्के इतकी रुग्णवाढ झाली आहे. त्यानंतर भारतात 7 टक्के आणि इराणमध्ये 24 टक्के रुग्णवाढ झाली आहे. तर इंडोनेशियात 5 टक्के, ब्राझिलमध्ये 24 टक्के रुग्णांची संख्या घटली आहे.