नवी दिल्ली – भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिला भारतीय टेबल टेनिस महासंघाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनिकाने राष्ट्रीय प्रशिक्षकाचे मार्गदर्शन घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे महासंघाने मनिकावर कारवाई करण्याचे संकेतही काही दिवसांपूर्वी दिले होते.
मनिकाने ऑलिम्पिक स्पर्धेत महिला एकेरीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात मनिका तिच्या प्रशिक्षकांशिवाय उतरली होती. तिच्या खासगी प्रशिक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी नव्हती.
त्यामुळे मनिकाने निषेध म्हणून राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांचे मार्गदर्शन घेण्यास नकार दिला होता. मनिका बत्राचे खासगी प्रशिक्षक तन्मय परांजपे यांना वादग्रस्तपणे तिच्याबरोबर टोकियोला जाण्याची परवानगी देण्यात आली होती.
मात्र, मनिकाला क्रीडाग्राममध्ये राष्ट्रीय संघासह राहण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. ती एका हॉटेलमध्ये राहत होती.