चंडीगढ –निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी गुरूवारी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या प्रमुख सल्लागारपदाचा राजीनामा दिला. सार्वजनिक जीवनात सक्रिय राहण्यापासून काही काळ विश्रांती घेण्यासाठी ते पद सोडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंजाबमधील 2017 या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने घवघवीत यश मिळवून सत्ता संपादन केली. त्या निवडणुकीतील कॉंग्रेसच्या प्रचार मोहिमेत किशोर यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. आता पंजाबमध्ये पुढील वर्षी होणारी निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. ती निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन कॉंग्रेसचे नेते असणाऱ्या अमरिंदर यांनी मार्चमध्ये किशोर यांची प्रमुख सल्लागारपदी नियुक्ती केली. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. अर्थात, किशोर केवळ 1 रूपया इतके प्रतिकात्मक मानधन स्वीकारणार असल्याचे पंजाब सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
पुढील निवडणुकीसाठी अमरिंदर यांची म्हणजेच कॉंग्रेसची रणनीती ठरवण्याची जबाबदारी किशोर सांभाळणार असल्याची चर्चा सुरू होती. अशात किशोर यांनी अमरिंदर यांचे आभार मानणारे पत्र पाठवून राजीनाम्याचा मानस व्यक्त केला. पुढील वाटचालीचा निर्णय मला अद्याप घ्यायचा आहे. तूर्त, मला प्रमुख सल्लागारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती त्यांनी पत्रातून केली.
पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत किशोर यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला साथ दिली. त्या पक्षाने घवघवीत यश मिळवल्यानंतर किशोर यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम थांबवण्याचा इरादा बोलून दाखवला. मागील काही काळात ते कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निकट पोहचल्याचे चित्र आहे. त्यातून किशोर यांच्या संभाव्य कॉंग्रेस प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर, कॉंग्रेसकडून त्यांच्यावर राष्ट्रीय स्तरावर महत्वाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे संकेतही मिळत आहेत.