पुणे -एकेकाळी “सायकलींचे शहर’ अशी ओळख असणाऱ्या पुणे शहरात आता सायकल चालवणे असुरक्षित वाटत आहे. दुचाकी-चारचाकी वाहनांचा वापर प्रचंड वाढला. पण, सायकल चालवणाऱ्यांसाठी सुविधाच नाहीत. त्यामुळेच ही असुरक्षितता आहे. पुण्याला पुन्हा “सायकलींचे शहर’ ओळख मिळवून देण्यासाठी “डेडिकेटेड’ सायकल झोन व्हावेत, अशी अपेक्षा अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
जगातील सायकलवीरांच्या सन्मानार्थ युनायटेड नेशन्सने 2018 मध्ये दि. 3 जून हा दिवस सायकल दिन म्हणून घोषित केला होता. यंदा या दिवसाची संकल्पना “सायकलची विशिष्टता, अष्टपैलुत्व, दीर्घायुषी आणि वाहतुकीचे साधे, टिकाऊ, परवडणारे आणि विश्वासार्ह साधन’ ही ठेवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर “प्रभात’ने अभ्यासकांशी संवाद साधला.
याबाबत परिसर संस्थेचे सुजित पटवर्धन म्हणाले, “80-90च्या दशकापर्यंत पुण्यात सायकलींचा वापर मोठ्या प्रमाणात होता. सायकल या केवळ विशिष्ट वर्गासाठी नव्हत्या, तर लहान मुले, स्त्रिया, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिक असे सर्वच जण सायकलींचा वापरत असत.
मात्र, काळाच्या ओघात पुण्याची ही ओळख पुसली गेली. ती पुन्हा मिळविणे अवघड नाही, मात्र त्यासाठी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय आणि दूरदृष्टी महत्वाची ठरते. सायकल चालवण्याबाबतची असुरक्षितता घालवण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
लक्ष्मी रस्ता, फर्गसन रस्ता, मध्यवर्ती बाजारपेठा केवळ “वॉकिंग प्लाझा अथवा सायकल झोन’ म्हणून घोषित केल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल.’
सायकल चालवण्याचे विविध फायदे
आरोग्य
मानसिक आरोग्य सुदृढ राहते
रोप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत
हृदयरोग, कॅन्सरसारख्या आजाराचा धोका कमी करण्यास मदत
फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवण्यास उपयुक्त
आर्थिक विकास
वाहतुकीसाठी परवडणारे साधन
इंधनाचा वापर होत नसल्याने वैयक्तिक तसेच शासकीय खर्चात कपात
आरोग्यविषयक धोका आणि त्यावरील खर्च टाळण्यास उपयुक्त
पर्यावरण
इंधनाचा वापर होत नाही
हवेचे प्रदूषण कमी करते.
ध्वनी प्रदूषण होत नाही
पार्किंगची समस्या उद्भवत नसल्याने “ग्रीन स्पेस’ विकासासाठी मदत