World Cup 2023 New Zealand vs Afghanistan Match : गतविजेत्या इंग्लंडला पराभूत करून अफगाणिस्तानने विश्वचषक स्पर्धेतील सर्व संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली असून आज( बुधवार,18 आॅक्टोबर) चेन्नई येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या 16 व्या सामन्यात न्यूझीलंड अफगाणिस्तान संघाला नक्कीच हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. न्यूझीलंड संघाला स्पर्धेतील आपले अपराजित अभियान सुरू ठेवायचे आहे. त्याचवेळी अफगाणिस्तान आणखी उलटफेर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. हा सामना दुपारी 2वाजता सुरू होईल. त्यापूर्वी दुपारी 1.30 वाजता टाॅस करण्यात येईल.
त्याचवेळी दिल्लीत झालेल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा 69 धावांनी पराभव करणाऱ्या अफगाणिस्तानचे आणखी एक उलटफेर करण्याचे लक्ष्य असेल. न्यूझीलंडने आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले असून धावगतीच्या आधारावर भारताच्या मागे त्याचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
लॅथम असेल किवी संघाचा कर्णधार…
त्याचबरोबर पहिल्या दोन सामन्यात बांगलादेश आणि भारताकडून अफगाणिस्तानचा पराभव झाला होता, मात्र तिसऱ्या सामन्यात हशमतुल्ला शाहिदीच्या संघाने इंग्लंडसारख्या दिग्गज संघाला पराभूत करून नवा इतिहास रचला. न्यूझीलंडचे नेतृत्व पुन्हा एकदा यष्टिरक्षक फलंदाज टॉम लॅथम करणार आहे कारण नियमित कर्णधार केन विल्यमसन डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यामुळे काही सामन्यांतून बाहेर आहे.
वेगवान गोलंदाज टीम साऊदी अंगठ्याच्या दुखापतीतून सावरला असून तो या सामन्यात खेळू शकतो की नाही याबाबत संभ्रम आहे. न्यूझीलंडकडे विल यंग, डेव्हॉन कॉनवे आणि डॅरिल मिशेलसारखे फलंदाज आघाडीच्या फळीत आहेत, तर अष्टपैलू रचिन रवींद्रनेही प्रभावी कामगिरी केली आहे. आता त्यांना रशीद खान आणि मोहम्मद नबी यांच्या फिरकीचा सामना करावा लागेल, ज्यांनी इंग्लंडच्या फंलदाजांच्या नाकी नऊ आणले होते. चेपॉकच्या टर्निंग विकेटवर अफगाणिस्तानचे फिरकी गोलंदाज किवी फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतात.
तर दुसरीकडे फंलदाजीत अफगाणिस्तानसाठी सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजने दोन सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत, तर कर्णधार शाहिदी, अजमतुल्ला ओमरझाई आणि इक्रम अलीखिल यांनीही उपयुक्त खेळी खेळल्या आहेत. आता त्यांना ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री यांच्या वेगवान आणि रवींद्र आणि मिचेल सँटनरच्या फिरकीचा सामना करावा लागेल. या फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ केवळ दोन वेळा आमनेसामने आले आहेत आणि दोन्ही वेळा न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.