साताऱ्यातील मेडिकल कॉलेज, कास धरणाचा प्रकल्प मार्गी लागणार
सातारा – कोयना धरण परिसरातील गावांसाठी दळणवळणाचा मार्ग खुला व्हावा, रोजगार उपलब्ध व्हावा व पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने कोयना धरणात जलवाहतूक सुरू करण्यासंदर्भात धरणाच्या सुरक्षेची काळजी घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, सातारचे मेडिकल कॉलेज, कास धरणाची उंची वाढविण्याच्या प्रकल्पासाठी वाढीव निधी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याने हे प्रकल्प मार्गी लागण्याचा आशा पल्लवित झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोयना धरण जलवाहतूक संदर्भात विधान भवनात बैठक झाली. अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, अप्पर पोलीस महासंचालक मिलिंद भारंबे, साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते.
कोयना धरणाच्या सुरक्षेला बाधा येणार नाही, याची दक्षता घेऊन धरणात जलवाहतूक सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गृह, जलसंपदा, वन विभागाच्या समन्वयाने प्रस्ताव सादर करावा. सध्या असलेली जेटी पोलीस गस्तीसाठी योग्य असून जलवाहतुकीसाठी नवीन जेटीबाबत पाहणी करून जागा निश्चित करावी, अशा सूचना ना. पवार यांनी दिल्या.