विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा जीव टांगणीला
दावडी – कनेरसर येथील जिल्हा परिषद शाळा इमारत धोकादायक असल्याने शासनाने तातडीने इमारतीला निधी मंजूर करावा, अशी मागणी माजी मंत्री तथा विधानपरिषदेचे आमदार भाई गिरकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कनेरसर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 1963 मध्ये बांधण्यात आली आहे; मात्र सध्या ही इमारत जीर्ण झाली असून यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे, त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत खेड तालुका भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष अशोक टाव्हरे यांनी तक्रार केली होती. भाजप विधानभवन सचिव राजु खंडिझोड यांनी पुढाकार घेत कनेरसर येथे भेट देऊन शाळेची पाहणी केली होती.
केंद्रप्रमुख संदीप म्हसुडगे, मुख्याध्यापक नानाभाऊ गावडे व भाजपचे खेड तालुका उपाध्यक्ष दिलीप माशेरे यांनी शाळेची मोडकळीस आलेली इमारत दाखविली. इमारतीला अनेक ठिकाणी चिरा पडल्या आहेत. इमारतीची धोकादायक स्थिती पाहून आमदार भाई गीरकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केली असून कार्यकारी अभियंता जिल्हापरिषद यांनी मागील वर्षी इमारत धोकादायक असल्याचा लेखी अभिप्राय देऊनही शासन दखल घेत नसल्याने विद्यार्थी व शिक्षक यांच्या हितासाठी तातडीने निधी द्यावा, अशी मागणी केली आहे.
हा गंभीर प्रश्न विधानसभा अधिवशनात तारांकित प्रश्न आमदार गिरकर करणार असून याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्राद्वारे परिस्थिती सांगितली असल्याचे भाजपच्यावतीने सांगण्यात आले.