डोर्लेवाडी – मूळव्याध बरा करतो म्हणून उपचार करण्यासाठी बोलावून घेतलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील तरुणांचे गाडीतच ऑपरेशन करून मूळव्याधाचा कोंब काढल्याचा दावा करून त्याच्याकडून दहा हजार रुपये उकळले. याप्रकरणी बोगस डॉक्टर दुर्गा तायाप्पा शिंदे यास बारामती तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यावेळी त्याने वापरलेले वेगवेगळे साहित्य व औषधे सर्व जप्त करण्यात आले आहे.
डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी वैशाली देवकाते यांनी याबाबत रात्री फिर्याद दिल्यानंतर शुक्रवार (दि.21) बोगस डॉक्टरावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती तालुक्यात मूळव्याधीवर उपचार करण्यासाठी बोगस डॉक्टर हे प्रकार करीत असतील तर त्वरित, वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला कळवावे, जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही व अशा घटनांना आळा बसेल, असे आवाहन बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले आहे.