पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुलींच्या शिक्षणात अग्रेसर असलेल्या “एसएनडीटी कॉलेज’ ला इंद्रायणी बालन फाउंडेशनच्यावतीने ६० अद्ययावत संगणक नुकतेच भेट देण्यात आले. या संगणक लॅबचे उद्घाटन फाउंडेशनचे अध्यक्ष आणि उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, मुख्याध्यापिका डॉ. अंजली कदम आदी उपस्थित होते.
बालन आणि इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून देशभर मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, क्रीडा, संरक्षण या क्षेत्राचा समावेश आहे. शिक्षण क्षेत्र हे विकासाचा पाया रचण्यात शिक्षण क्षेत्राचा मोठा वाटा असल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी मदत केली जाते. याच उद्देशाने “एसएनडीटी’ कॉलेजसाठी संगणक देण्यात आले.
या द्ययावत संगणकांमुळे मुलींना अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी मदत होणार आहे. याआधी संगणकांची संख्या कमी असल्यामुळे मुलींना संगणक शिकण्यासाठी कमी वेळ मिळायचा. पण आता इंद्राणी बालन फाउंडेशनने केलेल्या या अमूल्य मदतीमुळे मुलींना संगणक अधिक वेळ वापरता येईल, असे सांगून चक्रदेव यांनी फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन यांचे आभार मानले.
आजच्या “आयटी’च्या युगात संगणक शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रामुख्याने मुलींना प्रतिष्ठा, आत्मसन्मान मिळण्यासाठी आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी हे शिक्षण गरजेचे आहे. “एसएनडीटी कॉलेज’कडे पुरेसे संगणक उपलब्ध नसल्याने विद्यार्थीनांना संगणक शिक्षणासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता.
त्यामुळे त्यांच्यासाठी संगणक उपलब्ध करून देण्याची संधी आम्हाला मिळाली. या मुली येथे शिक्षण घेऊन जगात उंच भरारी घेऊन आपल्या शहराचे आणि देशाचे नाव उज्वल करतील असा विश्वास आहे. – पुनीत बालन, अध्यक्ष, इंद्राणी बालन फाउंडेशन