पिंपरी -जुन्या वादाच्या कारणावरून शीतपेयामधून विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शुक्रवारी (दि.5) चिखली पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मिलिंद डांगरे (रा. पिंपळे निलख) असे विषप्रयोग झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी जयश्री डांगरे (वय 34) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विकास अनंत ढोले (रा. हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी जयश्री यांच्याबद्दल चुकीचे बोलण्यावरून त्यांचे पती मिलिंद व आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. याच राग मनात धरून एका आठवड्यापूर्वी (दि.1) आरोपी व फिर्यादी यांचे पती भेटले असता आरोपीने त्यांना शीतपेयातून विषारी औषध दिले. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. हा प्रकार समजल्यानंतर त्यांच्या पत्नी जयश्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चिखली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक महेंद्र आहेर अधिक तपास करीत आहेत.