सातारा : बहुचर्चित गुलबहार हॉटेलवरील कारवाईचा अखेर पर्दाफाश झाला. सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी टाकलेल्या छाप्यात हॉटेल मालकांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला. कोरोना काळात हे हॉटेल शासनाने अधिग्रहित केले असतानाही येथे खासगी लोकांना जेवण देणे, लॉजिंगसाठी रुम देण्याचे प्रकार होत असल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे कोरोना विषाणूचा संसर्गास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
हॉटेल मालक हरदीपसिंग गुरमितसिंग रामगडीया (रा. रविवार पेठ, सातारा), हॉटेल मालक ॲड. कमलेश मधुकर पिसाळ (रा. केसरकर पेठ, सातारा), किशोर संजय मोहिते (वय २७, रा. कोडोली, ता. सातारा), धनंजय महादेव देसाई (वय ४२, रा. गोडोली, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार विशाल धुमाळ यांनी तक्रार नोंदविली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोवई नाक्यावरील गुलबहार हॉटेलमध्ये पार्टी चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याची दखल घेत सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाने या हॉटेलवर छापा टाकला. छाप्यामध्ये सुमारे चार ते पास हॉटेलची तपासणी करण्यात आली.
कोरोना बाधित रुग्णांना तपासणारे डॉक्टर्स येथे राहत असून, येथे पोलिसांनी का छापा टाकला, याची चर्चा सर्वत्र पसरली. या कारवाईमुळे शहरात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
पोलिसांनी कारवाई केल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल होणे आवश्यक होते. मात्र, दोन दिवस उलटले तरीही गुन्हा दाखल झाला नाही.
त्यावर प्रसार माध्यमांची आवाज उठविला. त्याची दखल घेत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजवर माहिती संकलित करण्यासाठीमुळे गुन्हा दाखल होण्यास वेळ लागल्याचे वरिष्ठांनी सांगितले.समीर शेख यांनी या प्रकरणाचा तपास करुन त्याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार आज या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
गुलबहार हॉटेल शासनाने अधिकृत केले आहे. असे असतानाही सीसीटीव्ही फुटेजवरुन तब्बल ३० लोकांनी जेवण केल्याचे दिसत आहे. हॉटेलच्या संगणकावरुन १९ बिले देण्यात आली असून, ती बिले जप्त केली आहे. त्यामुळे तेथे जेवण दिल्याचे समोर आले आहे. तसेच खासगी लोकांना राहण्यासाठी लॉजिंग दिल्याचे उघड झाले.
तो अधिकारी कोण?
गुलबहार हॉटेलची कारवाई करताना सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेले असून, त्यामध्ये एक शासकीय अधिकारी मित्रांसमवेत दारु पित जेवण करताना आढळून आला आहे. हॉटेलिंगवर मनाई असताना हॉटेल सुरु ठेवले, त्यातही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करत तेथे जेवण, दारु पिण्याची मगरुरी कोणत्या अधिकाऱ्यांमध्ये आहे, ते प्रशासनाने उघड केले पाहिजे. समीर शेख यांच्या अहवालात सदर अधिकाऱ्याचे नाव असून, त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्याची हिंमत वरिष्ठांनी दाखविली पाहिजे.
माहिती देण्यास टाळाटाळ
एरवी छोट्या मोठ्या कारवायांची माहिती देणार्या सातारा शहर पोलिसांनी या कारवाईबाबत मौन बाळगल्याचे दिसून आले. कारवाई झाल्यानंतर दोन दिवस झाले तरी माहिती देण्यास कोणीच तयार नसल्याचे समोर आले.