क्रिकेट काॅर्नर : ॲडलेडची पुनरावृत्ती होणार का?

– अमित डोंगरे

हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा 78 धावांमध्ये बट्ट्याबोळ झाला आणि लगेचच जागतिक स्तरावरील सोकॉल्ड समिक्षक संघाच्या दर्जाबद्दलच शंका घेऊ लागले. तसे पाहिले तर त्यात गैर नाही, पण भारतीय संघाने अशाच अवस्थेचा गेल्या वर्षी ॲडलेडमध्ये सामना केला होता. मात्र, त्यानंतर अफलातून कामगिरी करत संघाने थाटात पुनरागमन केले व ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करत मालिका जिंकली. 

हेच इंग्लंडमध्ये होणार का? हेडिंग्ले कसोटीत ज्या पद्धतीने भारतीय फलंदाज बाद झाले ते पाहता त्यावर काय बोलावे हेच समजेनासे झाले आहे. काही प्रश्‍न या निमित्ताने निर्माण झाले. नाणेफेकीपूर्वी कर्णधार विराट कोहलीने खेळपट्टी पाहिली होती मग तरीही त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय का घेतला असावा? संघात चार वेगवान गोलंदाज असताना आणि सकाळच्या गारव्यात खेळपट्टीवर दव असूनही त्याला आपल्या गोलंदाजीवर विश्‍वास नव्हता का?

इंग्लंडच्या गोलंदाजीत दम वगैरे काही नव्हता पण उजव्या यष्टीच्या बाहेर जात असलेल्या चेंडूला बॅट लावण्याचा मोह भारतीय फलंदाजांना टाळता आला नाही. लोकेश राहुल, चेतेश्‍वर पुजारा, कोहली, अजिंक्‍य रहाणे यांचे बाद होणे म्हणजे एक प्रकारचा आत्मघातच होता हे कोणीही नाकारणार नाही, पण मग रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्या बाद होण्याला आत्महत्या म्हणावे का? इंग्लंडच्या संघात जेम्स अँडरसन हा एकमेव हुशार गोलंदाज आहे. ओली रॉबिन्सन, क्रेक ओव्हरटन आणि सॅम कुरेन हे म्हणजे ग्लेन मॅकग्रा, वसीम अक्रम किंवा ऍलन डोनाल्ड नव्हे.

एका साधारण गोलंदाजीला आपणच जागतिक दर्जाची बनवली. खेळपट्टीवर सकाळच्या सत्रात पहिल्याच दिवशी फलंदाजी करताना एक गोष्ट आपले फलंदाज विसरले. पहिला एक तास गोलंदाजांना द्या. तोपर्यंत खेळपट्टीवरचे दव नाहीसे होते. थोडे ऊन पडल्यावर खेळपट्टी ड्राय व्हायला लागते. चेंडू स्विंग होणे कमी होते व चेंडू अगदी आरामात बॅटवर येतो. हे सगळे नवे नाही तर अनेक वर्षे चालत आलेले धोरण आहे की, गोलंदाजांना पहिला एक तास द्या दिवसातील उर्वरित खेळात फलंदाजांचेच राज्य होते.

कोहली आणि कंपनी अनुभवी व पहिलाच कसोटी सामना खेळत असल्यासारखे भांबावलेले दिसले. एक जागतिक दर्जाची फलंदाजी इतकी बेजबाबदार कशी असू शकते हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जर कोहलीला पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करायची होती तर त्याने चार वेगवान गोलंदाज खेळवण्याऐवजी दोन फिरकी गोलंदाज का खेळवले नाहीत. रवीचंद्रन अश्‍विनला बाहेर का ठेवले.

पहिल्या डावात परदेशातील खेळपट्टीवर अत्यंत सावध फलंदाजी करायची असते. पहिली दहा ते पंधरा षटके संथ खेळ करणे गरजेचे असे मग सगळेच घायकुतीला आल्यासारखे फलंदाजी का करत होते? मला वाटते एकूणच भारतीय फलंदाजांनी आपल्याला नक्की काय करायचे याचा विचार करायला हवा. कसोटी सामना मर्यादित षटकांच्या सामन्यासारखा खेळायचा की तंत्र सिद्ध करत आपली फलंदाजी जागतिक दर्जाची आहे ते सिद्ध करायचे याचा विचार आता तरी भारतीय खेळाडू करतील का? गेल्या वर्षी ऍडलेडला ज्या पद्धतीने भारतीय संघाने 36 धावांत खुर्दा उडाल्यावर थाटात पुनरागमन केले ते या सामन्यात घडेल का?

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.