नवी दिल्ली : देशातील करोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र देशात मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी वापरल्या जात असलेल्या कोविशिल्ड लसीचा वापर केला जात आहे. मात्र या लसीमुळे युरोपमध्ये जाण्याच्या तयारीत असणाऱ्या भारतीयांसमोर मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सीने कोविशिल्ड लस ग्रीन पास यादीत ठेवले नाही त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, युरोपियन मेडिसिन एजन्सीने याबाबत खुलासा केला आहे.
युरोपियन युनियनने ग्रीन पास पद्धती सुरू केली आहे. यात युरोपियन मेडिसिन एजन्सीने काही लसींना मंजुरी दिलेली आहे. मंजुरी दिलेली लस घेतलेल्या परदेशी प्रवाशांनाच युरोपमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असणारा ग्रीन पास दिला जाणार आहे. हा ग्रीन पास मिळाल्यानंतर ती व्यक्ती युरोपातील २७ देशांमध्ये जाऊ शकते.
ही ग्रीन पास पद्धती १ जुलैपासून संपूर्ण युरोपात लागू केली जाणार आहे. तर स्पेन, जर्मनी, ग्रीस, पोलंड आदी देशांनी याची अंबलबजावणी सुरू केली आहे. दरम्यान, ग्रीन पास मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीच्या यादीत भारतातील कोविशिल्ड लसीचा समावेशच केलेला नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.
युरोपियन मेडिसिन एजन्सीने ग्रीन पास यादीत कोविशिल्ड नसण्याच्या कारणांवर भाष्य केले. “कोविशिल्ड लस अॅस्ट्राझेनेकाच्याच वॅक्सझेवरियाच्याच फॉर्म्युल्याने तयार करण्यात आलेली असली, तरी कोविशिल्ड लसीला सध्या युरोपातील राष्ट्रांमध्ये परवानगी मिळालेली नाही.
उत्पादन होत असलेल्या ठिकाणे वेगळी असल्याने अंतिम उत्पादनातही फरक असू शकतो” असे युरोपियन मेडिसिन एजन्सीचे माध्यम अधिकारी झाला ग्रु्दनिक यांनी म्हटले आहे. युरोपियन कायद्यानुसार लसीला परवानगी मिळवण्यासाठी उत्पादन होत असलेल्या ठिकाणीला भेट देऊन लस निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली जात. लसीला मंजुरी देण्यातील हा महत्त्वाचा भाग आहे.