सोलापूर – ‘मी तालुक्याचा सभापती आहे, एक दोन मर्डर सहज खपवू शकतो, आमदार आमचाच आहे आणि पोलीस स्टेशन त्यांच्या खिश्यात आहे. या अगोदर माझ्याविरोधात ज्या तक्रारी दिल्या त्याचं पोलिसांनी काय केलं माहिती आहे. असं म्हणत पंचायत समितीच्या सभापतीने एका आरटीआय कार्यकर्त्यावर गोळीबार केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैरागमधील जोतिबाचीवाडी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अनिल डिसले असे गोळीबार करणाऱ्या सभापतीचे नाव आहे. तर प्रमोद ढेंगळेवर असे आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी वैराग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरटीआय कार्यकर्ते प्रमोद ढेंगळे जोतिबाचीवाडी बस्थानकावरून आपल्या घरी रस्त्यावरुन जात होते. तेव्हा वाटेत त्यांना सभापती अनिल डिसले यांनी हाक देऊन भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर अनिल डिसले यांनी प्रमोद यांच्या डोक्यावर रिव्हॉलवर ठेवून अश्लिल शिवीगाळ सुरू केली. यावेळी यांच्यात लहू डिसले या व्यक्तीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण, वाद काही थांबला नाही. त्यामुळे घटनास्थळावरून प्रमोद आणि एक स्थानिक लहू डिसले यांनी पळ काढला असता अनिल डिसलेने गोळीबार केला. प्रमोद ढेंगळे आपल्या घरात जाऊन लपले. त्यानंतरही आरोपीने घरासमोर येऊन शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
आरटीआय कार्यकर्ते प्रमोद ढेंगळे यांनी ग्रामपंचायत आणि पंचायत समिती कारभाराची माहिती मागवली होती, या वादातूनच गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.