बारामती : सिद्धेश्वर निंबोडी (ता. बारामती) येथील करोना संक्रमित दोन रुग्णांच्या संपर्कातील 31 जणांची कोविड-19 चाचणी करण्यात आली आहे. त्यांचे तपासणी अहवाल अद्याप आलेले नाहीत. सोमवारी (दि. 1) रात्री उशीरपर्यंत अहवाल प्राप्त होतील, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली आहे.
पुण्याहून आई-वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या पोलीस अधिकारी मुलाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील 13 वर्षीय मुलास व 65 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीस करोनाची बाधा झाली. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील 31 जणांचे नमुने सोमवारी (दि. 1) तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल अद्याप आलेले नसल्याने सिद्धेश्वर निंबोडी येथील नागरिकांची धाकधूक वाढली आहे. पुण्यात वास्तव्यास असलेला पोलीस अधिकारी मुलगा भेटून गेल्यानंतर 15 दिवसांनी कुटुंबातील दोघांना करोनाची बाधा झाली आहे.
कुटुंबातील चौघांची कोविड-19 चाचणी करण्यात आली होती त्यापैकी दोन पॉझिटिव्ह व दोन निगेटिव्ह रिपोर्ट आले. त्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 31 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, सिद्धेश्वर निंबोडी गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. गावच्या सीमा बंद करण्यात आले असून पाच किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.