चौदा लाखांचा ऐवज जप्त; आठजणांना अटक
सातारा (प्रतिनिधी) : फलटण तालुक्यातील कुरवली (खु) येथील बाणगंगा नदी पात्रात सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. यावेळी अनिल बबन पवार, सुखदेव हिरालाल जाधव (दोघे रा. जिंती नाका, फलटण), आदेश जालिंदर जाधव (रा. वाठार निंबाळकर,ता. फलटण), विनोद रामभाऊ मदने, तानाजी बाबांना जाधव (दोघे. रा. धुळदेव, ता फलटण), वैभव संजय निंबाळकर (रा विंचुर्णी ता फलटण), मालोजी उर्फ पप्पू बाळू जाधव (रा जाधववाडी ता फलटण), नवनाथ ज्ञानेश्वर भंडलकर (रा तावडी ता फलटण) या संशयितांना सहा ट्रॅक्टर, एक टेम्पोसह ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण तालुक्यातील कुरवली (खु) गावातून जात असलेल्या बाणगंगा नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. साबळे यांनी रविवारी मध्यरात्री संबंधित ठिकाणी छापा टाकला असता वरील आठजण नदीपात्रातून ट्रॅक्टर व टेम्पोतून वाळूची वाहतूक करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आठजणांना ताब्यात घेत वाळू वाहतूक करण्याबाबतचा परवाना आहे का अशी विचारणा केली. तेव्हा त्यांनी परवाना नसल्याचे सांगताच त्यांना ताब्यात घेतले व त्यांच्या ताब्यातील वाळूने भरलेले सहा ट्रॅक्टर एक टेम्पो चौदा लाख तेवीस हजार रुपयांचा ऐवज जप्त करुन त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहाय्यक फौजदार विलास नागे, संतोष जाधव, गणेश कापरे, वैभव सावंत, विजय सावंत यांनी ही कारवाई केली.