महापालिकेला 15 हजारांचा संच पडला 25 हजारांत
30 संचांची खरेदी : अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
पुणे – करोनाकाळात होणाऱ्या खर्चाला कोणताच धरबंद राहिला नाही, हे कोविड केअर सेंटरमधील 15 हजार रुपयांचा एक टीव्ही संच 25 हजार रुपयांना घेतल्या प्रकरणावरून पुन्हा सिद्ध झाले आहे. असे 30 संच खरेदी करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या सणस स्पोर्टस हॉस्टेल येथील कोविड केअर सेंटरमध्ये ते बसवण्यात आले आहेत. हे संच तब्बल प्रत्येकी 10 हजार रुपये अधिकदराने खरेदी केले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नगरसेवक महेंद्र पठारे यांनी केली आहे.
महापालिकेच्या विद्युत विभागाने सणस स्पोर्ट हॉस्टेल येथील कोविड सेन्टरमध्ये 32 इंचाचे 30 एलईडी टीव्ही बसवले आहेत. एका संचाची किंमत 25 हजार असून, यासाठी 30 संचासाठी 7 लाख 56 हजार इतकी रक्कम देण्यात आली आहे. प्रत्यक्षात ज्या कंपनीचे हे टीव्ही आहेत त्या टीव्हीची खुल्या बाजारात 14 हजार 999 इतकी किंमत आहे. असे असताना विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही खातरजमा न करता 17 एप्रिल रोजी ही खरेदी केली आहे.
प्रत्येक टीव्हीसाठी 10 हजार याप्रमाणे 3 लाख रुपये अधिक मोजण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि 67(3) अंतर्गत दिलेल्या अधिकारांचे अधिकाऱ्यांनी उल्लंघन केले आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. महापालिकेला फसवणाऱ्या संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही पठारे यांनी केली.
बाजारभावापेक्षा खरेदी करण्यात आलेल्या टीव्हीचे दर अधिक असल्याचे लक्षात आले आहे. मुळातच टीव्ही संचाचा पालिकेचा डीएसआर रेट 25 हजार आहे. संबंधित पुरवठादाराने 5 टक्के कमी दराने संच पुरवण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार पुरवठा केला आहे. परंतु त्याचे बिल अद्याप दिलेले नाही. बाजारभावानुसारच बिल अदा करण्यात येईल. याप्रकरणी चौकशी करण्यात येईल.
– श्रीनिवास कंदूल, प्रमुख, महापालिकेच्या विद्युत विभाग