हडपसर : “देव तारी त्याला कोण मारी” ही म्हण आपण अनेकदा ऐकली आहे, हडपसर मधील नोबल हॉस्पिटल मध्ये कोविड-१९ आजारावर उपचार घेणाऱ्या संदीप कुंभार यांच्या बाबतीत या म्हणीचा प्रत्यय आला आहे. तब्बल ६७ दिवस अतिदक्षता विभागात राहून त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
हडपसरचे रहिवासी असलेले संदीप कुंभार हे छोटेसे वर्कशॉप चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना ताप, खोकला, दम लागणे अशी लक्षणे जाणवू लागल्याने ते १७ जून २०२० रोजी नोबल हॉस्पिटल मध्ये दाखल झाले. हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन केल्यानंतर त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये कोविड न्यूमोनिया असल्याचे आढळून आले व त्यांचा कोविड अहवाल देखील पॉझिटिव आला. पहिल्याच दिवशी त्यांची प्रकृती खालावत आहे असे डॉक्टरांच्या लक्षात आल्याने त्यांना तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
अतिदक्षता विभागात ते बारा दिवस बायपेप मशिनच्या साह्याने श्वास घेत होते. मात्र त्यांचे फुफ्फुस खूपच कमी काम करत आहे असे डॉक्टरांच्या लक्षात आल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय डॉक्टर अमित द्रविड (संसर्गजन्य रोग तज्ञ) व डॉ. झेड ए खान (अतिदक्षता विभाग प्रमुख )यांनी घेतला २० दिवस व्हेंटिलेटर असताना त्यांना शिट्टी(Tracheostomy tube)बसवण्यात आली जेणेकरून ऑक्सिजन व्यवस्थित देता येईल.
एकूण ५२ दिवस अतिदक्षता विभागात राहिल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसांचे कार्य व्यवस्थित सुरू झाले व त्यांचे व्हेंटिलेटर बंद करुन त्यांना जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले दरम्यान त्यांचा कोविड अहवाल देखील निगेटिव आला. रुग्णाला फिजिओथेरपी देऊन चालवण्यात आले व शिट्टी काढून टाकण्यात आली.
जगभरात व्हेंटिलेटरवर ठेवलेले फक्त आठ ते दहा टक्के -कोविड-१९ रुग्ण बरे होतात व उर्वरित ९० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो मात्र संदीप कुंभार यांच्या बाबतीत हा चमत्कारच म्हणावा लागेल. नोबल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर दिलीप माने व कार्यकारी संचालक डॉक्टर एच. के.साळे यांच्या सशक्त प्रशासकीय देखरेखीखाली अतिदक्षता विभाग तज्ञ डॉक्टर झेड. ए.खान, डॉ. अमित द्रविड, नर्सेस इतर डॉक्टर व हाउसकीपिंग या टीमने अहोरात्र प्रयत्न करून संदीप कुंभार यांना जीवदान दिले.
नोबल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने म्हणाले की कोरोना संकटकाळात नोबल रूग्णालयातील पथक अथक परिश्रम घेत कामे करत आहेत. या काळात आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने निर्माण होणा-या प्रत्येक अडचणींवर मात करण्यात येत आहे. प्रत्येक रुग्णाणवर उपचार सुरु असताना त्यांच्या आरोग्य सुधारणेची काळजी घेत यशस्वीपणे घरी पाठवले जात आहे.
नोबल हॉस्पिटल चे कार्यकारी संचालक डॉक्टर एच.के.साळे म्हणाले की आजपर्यंत आम्ही १६०० पेक्षा अधिक कोविड रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार केले आहेत. संदीप कुंभार यांना जीवदान देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहेच मात्र त्यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही मनोबल वाढते.नोबल हॉस्पिटल व्यवस्थापनाने देखील संदीप कुंभार यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन शासकीय नियमाप्रमाणे आकारलेल्या बिलामध्ये ५०टक्के सवलत दिली आहे.