महापालिका शाळांचा प्रगतीचा टक्‍का वाढला

पालिकेच्या 15 शाळा प्रगत : शासनाच्या अध्ययन स्तर तपासणी अहवाल

पिंपरी – महापालिका शाळांमधील अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे अध्ययन स्तर तपासणी सुरु करण्यात आली होती. या माध्यमातून शहरातील महापालिकांच्या 105 शाळांची अध्ययन स्तर तपासणी करण्यात आली. यामधील, महापालिकेच्या 15 शाळा प्रगत असल्याचा अहवाल समितीने दिला आहे. या तपासणीत मागील वर्षी शहरातील एक शाळा प्रगत होती. परंतु, यंदा प्रगत शाळांची संख्या वाढल्याचे दिसत आहे.

शहरातील बहुतांश शाळांना डिजीटल माध्यमातून शिक्षण दिले जाते. यापूर्वी, महापालिकेच्या तीन शाळांना आय.एस.ओ मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे, महापालिका शाळांमध्ये राबवित असलेल्या विविध उपक्रमांचा फायदा विद्यार्थ्यांना होत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी महापालिका शाळांमध्ये प्रत्येक शाळेतील अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत.

शिक्षण समितीने नेमलेल्या विषय तज्ज्ञांकडून महापालिकेच्या शाळांची अध्ययन स्तर तपासणी करण्यात आली. यामधून, विद्यार्थ्यांना प्रगत करण्याच्या दृष्टीने शिक्षणाधिकारी, पर्यवेक्षक व विषयतज्ज्ञ शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. तसेच, शैक्षणिक चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांची गुणात्मक माहिती घेत होते. यामधून, विषयतज्ज्ञांना विद्यार्थी गुणात्मकरित्या कोणत्या स्तरामध्ये आहे, याची माहिती मिळाली.

अध्ययन स्तर तपासणी पद्धत

गेल्या वर्षी विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुलभूत क्षमता विकास कार्यशाळा घेण्यात आली होती. यंदा अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी सुरू केलेल्या अध्ययन स्तर तपासणीमध्ये मराठी, उर्दू, गणित व इतर विषयांचा समावेश केला होता. समितीतील विषयतज्ज्ञांनी मराठी विषयाचा स्तर तपासण्यासाठी जोडाक्षर, अक्षर ओळख, मुळाक्षरे आदींबाबत प्रश्‍न विचारुन अप्रगत व प्रगत विद्यार्थ्यांचा स्तर तपासला. तसेच, चित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले. विद्यार्थ्यांची संवाद वाढविण्यासाठी सामूहिक विषयावर चर्चा करण्यात आली.

ज्या विद्यार्थ्यांचा स्तर खाली आहे, त्यांना प्रगत करण्यासाठी विविध चाचण्यांच्या माध्यमातून धडे देऊन विद्यार्थ्यांना प्रगत करण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांशी संवाद वाढण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून विविध विषयावर चर्चा करण्यात आल्याचे, विषयतज्ज्ञांनी दै. “प्रभात’शी बोलताना सांगितले. महापालिका शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षण समितीतर्फे गेल्या वर्षी शाळा भेट हा उपक्रम राबविण्यात आला होता.

“महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी व अप्रगत विद्यार्थी प्रगत करण्यासाठी शाळांची अध्ययन स्तर तपासणी करण्यात आली. यामध्ये, यंदाच्या वर्षी शाळांची प्रगती उत्तम असल्याचे दिसून आले. शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा फायदा विद्यार्थ्यांना झाल्याचे दिसून आले. तसेच, अध्ययन स्तर तपासणीमध्ये बहुतांशी अप्रगत विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार आहे.
– ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.