Mahendragarh Accidnet । जीएल पब्लिक स्कूलच्या बसचा हरियाणातील महेंद्रगडमधील उनहनी गावाजवळ अपघात झाला. या अपघातात 6 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. बसमध्ये सुमारे 40 मुले होती. अनेक मुले जखमी झाली आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
सरकारी सुट्टीच्या दिवशीही शाळा सुरू करण्याबाबत शाळा प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. गंभीर जखमींना रेवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी हजर आहे. ओव्हरटेकिंगमुळे बसचा अपघात झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
#WATCH | Five students dead, 15 injured after a private school bus meets with an accident in Mahendragarh’s Kanina, in Haryana. pic.twitter.com/jhRvJo0hXg
— ANI (@ANI) April 11, 2024
नेमका अपघात झाला कसा
मिळालेल्या माहितीनुसार, जीएल पब्लिक स्कूलची बस कनिना-दादरी रोडवरून कनिबा शहराजवळून जात होती. दरम्यान, उन्हणी गावाजवळ बस उलटली. बस आधी झाडाला धडकली आणि नंतर नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. बसचा वेग जास्त असल्याने काही मुलांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उपचारादरम्यान एका मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 6 वर पोहोचला आहे. सुट्टीच्या दिवशीही शाळा का उघडण्यात आल्या, याची चौकशी प्रशासन करत आहे.
महेंद्रगडच्या निहाल हॉस्पिटलचे डॉक्टर रवी कौशिक यांनी सांगितले की,’जेव्हा विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये आणले तेव्हा त्यातील 4 जणांचा मृत्यू झाला होता. एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. 15 जखमी विद्यार्थ्यांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. एसडीएम व प्रशासन उपस्थित होते.’
काही लोकांचे म्हणणे आहे की,’बस चालक मद्यधुंद होता. त्यामुळे हा अपघात झाला. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय उपचारासाठी महेंद्रगड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले आहे. हरियाणाच्या शिक्षण मंत्री सीमा त्रिखा म्हणाल्या की, त्यांनी या प्रकरणी डीसी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. काही वेळाने तीही घटनास्थळी भेट देणार आहे.’