पुणे : लॉकडाऊनमध्येही एका लखोबाने अनेक आजी-माजी नगरसेवक आणि राजकीय कार्यकर्त्यांना चुना लावला आहे. धान्याचे किट मोफत देणार असल्याचे सांगत त्याने ट्रान्सपोर्टसाठी संबंधितांकडून रक्कम उकळली. हे पैसे ऑनलाइन मिळताच मोबाइल बंद ठेऊन त्याने पोबारा केला. हे प्रकरण काही हजारांवरच शेकल्याने पदाधिकाऱ्यांनी बदनामीच्या भीतीने तक्रार दिली नाही. मात्र, एका कार्यकर्त्याने सायबर सेलकडे तक्रार केल्यावर ही बाब उघडकीस आली.
संबंधित व्यक्तीने मावळातील आमदाराचा पीए असल्याचे सांगत यासर्वांना जाळ्यात ओढले होते. इतकेच नव्हे तर त्याने संबंधीत व्यक्तीचे फोन नंबर जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळवले होते.
याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात सायबर सेलकडून एक गुन्हा वर्ग झाला आहे. त्यानूसार अज्ञात मोबाईलधारकाविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी स्थानिक कार्यकर्ते संदिप काळे(30,रा.दांडेकर पुल) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीची आणि आरोपीची काही वर्षापासून फेसबुकवर मैत्री आहे. आरोपीने तो मावळातील आमदाराचा पीए झाल्याचे त्याला सांगितले होते. यामुळे त्यांचा फोन आणि सोशल मिडियावर अनेकदा संपर्क झाला होता. दरम्यान लॉक डाऊनमध्ये आमदारांच्यावतीने तीन हजार धान्यांचे कीट मोफत आपल्या परिसरात वाटण्यासाठी देण्यात येत आहेत. यासाठी तुम्हाला फक्त प्रती कीट दोन रुपये असा वाहतूक खर्च द्यावा लागेल असे फिर्यादीला सांगितले होते. त्यानूसार फिर्यादीने फोन पेव्दारे 5,500 रुपये पाठवले. यानंतर अनेक दिवस उलटूनही त्याला किट देण्यात आले नाही. त्याने आरोपीच्या फोनवर संपर्क केला असता, त्याचा फोन बंद होता.पोलिसांनी याचा सखोल तपास केला असता, संबंधीत व्यक्ती अनिरुध्द टेमकर पाटील म्हणून फेसबुकवर वावरत आहे. त्याच्या कॉल डिटेल्सची तपासणी केली असता, त्याने त्याव्दारे शहरातील अनेक आजी माजी नगरसेवक आणि राजकीय कार्यकर्त्यांना कॉल करुन मोफत धान्य किटचे आमिष दाखवले असल्याचे उघड झाले आहे. यातील काही जण त्याला पैसे पाठवून फसले गेले आहेत. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एन.आर.केंचे करत आहेत.
…असे पसरवले जाळे
संबंधीत आरोपी याने फेसबुकवर आमदारसोबत काढलेली छायाचित्र टाकली आहेत. संबंधीत आमदाराने आरोपीच्या मुलीला उपचारासाठी मदत केली होती. यावेळी काढण्यात आलेली छायाचित्रे टाकत त्याने तो आमदाराच्या जवळचा असल्याचे भासवले. यानंतर तो आमदाराचा पीए म्हणून नीवड झाल्याचे सांगत होता. त्याने मोफत किटसाठी फेसबुकवर संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून नगरसेवक आणि राजकीय कार्यकर्त्यांची यादी मिळवली होती. त्यांना फोनवरुन संपर्क साधून किट मोफत हवे असल्यास संपर्क करण्याचे आवहन केले होते.
निवडणूकीत फेकले होते जाळे
निवडणूकीच्या काळात आरोपीने अनेक उमेदवारांना पक्षाचा तीन कोटीचा निधी मिळवून देतो, त्यासाठी मला 25 टक्के रक्कम कमिशन म्हणून आगाऊ द्या असे फोन केले होते. मात्र 25 टक्के रक्कम मोठी होत असल्याने त्याच्या गळाला कोण लागले नाही. यातील काहींना त्यांना आता कीटसाठी संपर्क केला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.