नवी दिल्ली : कोरोनाच्या मृत्यूबाबत देशात सर्व काही सुरळीत असल्याचे भासवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवे अस्त्र बाहेर काढले.कोरोनाचा जागतिक मृत्यूदर प्रतिलाख 6.04 असताना भारतात मात्र तो केवळ एक आहे. हा मृत्यूदर जगात सर्वात कमी असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी केला.
देशांत आजपर्यंत 14 हजार 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 312 मृत्यू नोंदवले गेले आहेत. तर नवे बाधित 14 हजार 933 आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या सकाळी आठवाजेपर्यंत चार लाख 40 हजार 215 वर पोहोचली होती.
जागतिक आरोग्य संघटनेच्या 22 जूनच्या अहवालाप्रमाणे प्रति लाख व्यक्तींमामगे कोरोनाबळींचा दर इंग्लंडमध्ये 63.13, स्पेन 60.60, इटली 57.19, अमेरिका 36.30, जर्मनी 27.32, ब्राझील 23.68 आणि रशियात 5.62 आहे.
भारतात बाधितांची ओळख लवकर पटते. वेळीच तपासणी आणि देखरेख त्याचबरोबर संपर्कातील व्यक्तींची व्यापक शोधमोहीम आणि वैद्यकीय व्यवस्थापन यामुळे आपण मृत्यूदर रोखू शकलो आहोत. देशातील रुग्ण बरे होण्याचा वेग 56.38 टक्के झाला आहे. देशात दोन लाख 48 हजार 189 बाधित ठणठणीत झाले असून सक्रिय बाधित केवळ एक लाख 78 हजार 014 आहेत. गेल्या 24 तासांत 10 हजार 994 बाधित बरे झाले आहेत.
जून 22 पर्यंत करोना चाचण्यांची एकून संख्या 71 लाख 37 लाख 716 होती. तर 22 जूनला एकाच दिवशी एक लाख 87 हजार 223 चाचण्या घेण्यात आल्या. चाचण्या होणाऱ्या सरकारी लॅबची संख्या 726 तर खासगीची 266 आहे, असे आयसीएमआरच्या निवेदनात म्हटले आहे.