नगर – नगरमध्ये आढळलेल्या एका करोनाबाधित महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. येथील जिल्हा रुग्णालयात या महिलेचे सिझेरियन करण्यात आले. या महिलेने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. दोन्ही बाळांची आणि मातेची प्रकृती व्यवस्थित असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले.
मुंबई येथून एक गर्भवती महिला नगर तालुक्यातील निंबळक येथे आली होती. या महिलेची 25 मे ला करोना अनुषंगाने तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी तिचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. आज सकाळी साडेअकरा वाजता तिने या जुळ्यांना जन्म दिला. एक मुलगा आणि एका मुलीगी झाली असून, त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच दोन्ही बाळांचे वजन दोन किलो इतके आहे. दरम्यान, या दोन्ही मुलांची सुद्धा करोना अनुषंगाने तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, आज आणखी आठ करोनाबाधित व्यक्तींची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील जिल्ह्यात आलेल्या अशा एकूण बाधित रुग्णांची संख्या आता 103 झाली आहे. दरम्यान परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी स्वतःला विलगीकरण करून घ्यावे, तसेच सार्वजनिक संपर्क टाळावा आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह व इतर आजार आहेत त्यांनी सर्दी, खोकला किंवा इतर आजाराची लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावे, असे आवाहन ही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.