राजभवनच्या खर्चाला राज्यपालांची कात्री

राज्य सरकारकडे अधिक संसाधन उपलब्ध व्हावे यासाठी उपाय

पुणे – करोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारकडे अधिक संसाधन उपलब्ध व्हावे यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी राजभवनाच्या चालू आर्थिक वर्षातील खर्चाला कात्री लावली आहे.

विविध उपाययोजनांद्वारे ही कपात करण्याच्या सूचना त्यांनी राजभवन प्रशासनाला दिल्या आहेत.
त्यामध्ये राजभवनात कोणतेही नवे मोठे बांधकाम सुरू करण्यात येऊ नये. केवळ प्रगतीपथावर सुरू असलेलीच कामे पूर्ण करावीत. राजभवनात येणाऱ्या देशविदेशातील पाहुण्यांना स्वागताच्या वेळी भेटवस्तू वा स्मृतीचिन्ह देऊ नयेत. कोणतीही नवी नोकर भरती करू नये. स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला पुण्यातील राजभवनात राज्यपालांतर्फे आयोजित स्वागत समारंभ यंदा रद्द करावा.

राजभवनासाठी नवी कार विकत घेण्याचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात यावा. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या स्वागताच्या वेळी पुष्पगुच्छ देण्याची प्रथा बंद करावी. राजभवन येथील व्हीआयपी अतिथी कक्षांमध्ये शोभिवंत फुलदाणी ठेवू नये. कुलगुरू आणि अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेऊन, प्रवास खर्चात बचत करण्यात यावी. या उपायांचा समावेश आहे.

एक महिन्याचे संपूर्ण वेतन तसेच आगामी एका वर्षाचे स्वतःचे 30 टक्‍के वेतन करोना बाधितांच्या मदतीसाठी पंतप्रधान कोषाला देत असल्याचे राज्यपाल कोश्‍यारी यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

खर्चात होणार बचत…
या सूचनांची अंमलबजावणी केल्यास राजभवनाच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये 10 ते 15 टक्‍के बचत होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यातून वाचणारा निधी तुलनेने कमी असला तरी करोना संकटाशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे, असे मत राज्यपाल कोश्‍यारी यांनी व्यक्‍त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.