भिगवण – भिगवण (ता. इंदापूर) येथे मंगळवारी (दि. 28) करोना बाधित आढळलेल्या महिला रुग्णाचा गुरुवारी (दि. 30) सकाळी पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुणे ग्रामीण भागातील हा करोनाचा चौथा बळी ठरला आहे.
भिगवण स्टेशन येथील मृत महिला करोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 32 जणांना बुधवारी (दि. 29) बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे त्यांचे स्वॅबचे नमुने घेऊन ते पुण्यात पाठविले होते. त्यातील 18 जणांची करोना तपासणी अहवाल गुरुवारी (दि. 30) निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ व आरोग्य अधिकारी डॉ. अमित उदावंत यानी दिली.
या 18 मध्ये मृत करोनाबाधित महिलेच्या कुटुंबातील 4 आणि इतर 14 असे असे 18 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने भिगवणकरांना दिलासा मिळाला तरी या 18 जणांना क्वारंटान केले असून अद्याप 14 जणांचे अहवाल येणे बाकी असून तेही अहवाल निगेटिव्ह यावे, यासाठी भिगवणकर प्रार्थना करीत आहेत. तर गुरुवारी (दि. 30) आणखी 14 जणांना इंदापूर येथे तपासणीसाठी नेण्यात आले आहे.
जरी 18 जणांचे हवाल निगेटिव्ह आले असले तरी नागरिकांनी हुरळून न जाता शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महिलेला संक्रमण कोठून झाले ते अनुत्तरीतच
करोनाबाधित मृत महिलेच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. तसेच या महिलेला रुग्णास संक्रमण कोठून झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रसाशनाला सक्रीय रहावे लागणार आहे. तसेच नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.