मुंबई – राज्यात ओमायक्रोनबाधितांचा आकडा वाढत असतानाच अधिवेशनातील 32 जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 32 करोनाबाधितांमध्ये पोलीस कर्मचारी, काही मंत्रालय कर्मचारी तसेच विधानभवनातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले भाजप आमदार समीर मेघे यांना करोनाची लागण झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. याबाबत मेघे यांनी फेसबुकवर माहिती दिली होती. यानंतर आरोग्य विभागाकडून शनिवारी (25 डिसेंबर) 1500 जणांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी तब्बल 32 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीचा समावेश नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.