औगादौगौ, (बुर्किना फासो) – बुर्किना फासोमध्ये या आठवड्याच्या प्रारंभी दहशतवादी हल्ल्यामध्ये 41 जणांची हत्या करण्यात आली. या घटनेबद्दल बुर्किना फासोमध्ये दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
इस्लामी दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी सरकारकडून “व्हिलेज डिफेन्स पार्टी’ अर्थात “व्हिडीपी’ची स्थापना केली गेलेली आहे. त्यांना संरक्षणासाठीचे प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.
गेल्या गुरुवारी देशाच्या उत्तरेकडील लॉरेम प्रांतात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये “व्हिडीपी’ गटातील काही सदस्यांसह काही नागरिक मिळून 41 जण ठार झाले होते. या हत्याकांडाचा निषेध आणि मरण पावलेल्यांबद्दलची सहवेदना म्हणून दोन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येईल, असे सरकारी प्रवक्त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या दोन दिवसात सर्व सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रध्वज निम्म्यावर उतरवण्यात येतील आणि सर्व सरकारी कार्यक्रमही रद्द केले जाणार आहेत.