खडकी परिसरात खळबळ
खडकी – खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील एका कुटुंबातील तब्बल 34 जणांना करोनाची लागण झाली आहे. हे सर्व जण एकाच इमारतीत राहतात. या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे.
एकाच कुटुंबातील एवढ्या मोठ्या संख्येने करोना बाधित रुग्ण सापडण्याची पुण्यातील ही पहिलीच घटना असून हा परिसरच कंटोन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. संबंधित कुटुंब प्रमुखाच्या भावाचा रिपोर्ट 13 जून रोजी पॉझिटिव्ह आला होता. भावाला करोनाची लागण झाल्याने प्रशासनाच्या वतीने त्यांच्या कुटुंबातील 45 जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
तपासणीअंती सोमवारी संबंधित कुटुंबातील 10 जणांचे तर आज तब्बल 24 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याचे बोर्डाचे सदस्य कमलेश चासकर यांनी सांगितले. दरम्यान, बाधित राहत असलेल्या इमारतीला संपूर्ण सॅनिटायझर फवारणी करण्यात आली असून हा परिसर कंन्टेन्मेंट झोन केला आहे.