लंडन – ब्रिटनमध्ये करोनाची दुसरी मोठी लाट पसरली असून काल एका दिवसात त्या देशातील 33 हजार 470 जणांना करोनाची बाधा झाली आहे. बुधवारी तेथे एकूण 10 हजार 520 करोना रूग्ण आढळून आले होते तर गुरूवारी ही संख्या एकदम तिप्पट झाल्याने प्रशासन हादरले आहे.
ब्रिटनमध्ये आत्ता पर्यंत करोनाचे सुमारे 13 लाख रूग्ण आढळून आले असून 50 हजारांवर बळी गेले आहेत. ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेचे संचालक स्टीफन पोविस यांनी सांगितले की, गेल्या सात दिवसांची करोना रूग्णांची सरासरी ही 23 हजार 668 अशी आहे.
करोना रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत ही बाब खरी आहे असे नमूद करताना त्यांनी म्हटले आहे की रूग्णांची ही संख्या कमी करण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. ब्रिटनमध्ये पुन्हा एक महिन्याचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून त्याची मुदत 2 डिसेंबर पर्यंत असणार आहे. विविध प्रांतांच्या गरजेनुसार याची मुदत कमीजास्त केली जात आहे.
ब्रिटनमधील नागरीकांनी देश सोडून अन्य जाऊ नये असा सल्ला त्यांना देण्यात आला असून ब्रिटनमध्ये प्रवेश करणाऱ्या विदेशी नागरीकांना सक्तीने 14 दिवस क्वारंटाईन करून ठेवले जात आहे.