बारामती (प्रतिनिधी) – पाचशे रुपये कमिशनसाठी शासकीय सिल्वर जुबली रुग्णालयातून रुग्णांना ठराविक खासगी रुग्णालयात पाठवले जात असल्याची तक्रार शहरातील डॉक्टर पांडुरंग गावडे यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबत सखोल चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे.
बारामती शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सिल्वर जुबली या शासकीय रुग्णालयात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या छातीचा एक्स-रे काढण्यासाठी शहरातील ठराविक 2 खासगी रुग्णालयात रुग्णांना पाठविण्यात येत आहे. त्याबदल्यात पाचशे रुपये कमिशन घेतले जात असल्याचा आरोप डॉक्टर पांडुरंग गावडे यांनी केला आहे.
तसेच रक्त तपासणीसाठी रुग्णांना सर्रास खासगी प्रयोगशाळेत पाठवले जात असल्याचा आरोप देखील डॉक्टर गावडे यांनी केला आहे. याबाबत प्रांताधिकारी यांच्याकडे त्यांनी तक्रार केली असून याबाबत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. याबाबत वैद्यकीय अधीक्षक सदानंद काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.