ढाका – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या 14 दहशतवाद्यांना तेथील न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. 2000 मध्ये हा हत्येचा कट रचण्यात आला होता.
शेख हसीना यांच्या हत्येचे कारस्थान रचल्याच्या प्रकरणात 2017 मध्ये अगोदरच दहा दहशतवाद्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली असून अन्य दहशतवाद्यांना 20 वर्षे कैदेची शिक्षा जाहीर करण्यात आली आहे.
हरकत उल जिहाद इस्लामी अर्थात हुजी या संघटनेने हा कट रचला होता. या संघटनेचा म्होरक्या मुफ्ती हन्नान हा या कटाचा सूत्रधार होता. त्याला 2017 मध्येच फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. ब्रिटनचे बांगलादेशातील तत्कालीन उच्चायुक्तांच्या हत्येच्या कटाच्या प्रयत्नात त्याला ही शिक्षा देण्यात आली आहे.
शेख हसीना यांच्या मुळ गावी त्या प्रचाराला येणार होत्या. त्यावेळी त्याच्या सभेच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा कट आखण्यात आला होत. मात्र सुदैवाने सुरक्षा यंत्रणांना याचा अगोदरच सुगावा लागला व कट उधळून लावण्यात त्यांना यश आले. त्या प्रकरणी आज न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.