पुणे – शहरात मंगळवारी 12 करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृतांनी 400 चा टप्पा पार केला आहे. तर, दुसरीकडे नवीन 143 रुग्ण सापडले आहेत. गेल्या 24 तासांत 119 व्यक्ती बरे होवून घरी गेले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
शहरात सोमवारी 2 हजार 108 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. त्यातील जवळपास बाराशे जणांचे नमुने अहवाल प्राप्त झाले. केवळ 143 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर अन्य अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी दिवसभरात आणखी 1,697 जणांचे नमुने घेण्यात आले असून, सोमवारचे शिल्लक अहवाल आणि मंगळवारचे असे मिळून साधारण 2, 300 च्या आसपास अहवाल प्रतिक्षेत आहे.
सद्य:स्थितीत शहरात 2 हजार 498 व्यक्तींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यामध्ये नायडू आणि त्यांतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये एकूण 1 हजार 732, ससून रुग्णालयात 146 आणि खासगी रुग्णालयात 620 जण उपचार घेत आहे. त्यातील 189 बाधितांची प्रकृती चिंताजनक आहे. 37 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला असून, 152 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
विलंब केल्याने मृत्यू
बहुतांश बाधित व्यक्ती हे खूप त्रास झाल्यावर रुग्णालयात येत असल्यामुळे त्यांचा एक ते दोन दिवसांत मृत्यू होत आहे. मंगळवारीही मृत्यू झालेल्यांमध्ये 6 व्यक्ती हे उशिरा दि. 7, 8 किंवा 6 तारखेला रुग्णालयात दाखल झाले. त्यामध्ये दोघांचा 24 तासांच्या आत तर एकाचा 12 तासांच्या आत मृत्यू झाला. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये वयवर्षे 45 ते 78 या वयोगाटांतील व्यक्ती आहे. बिबवेवाडी, कोथरूड, सिंहगड रोड, सदाशिव पेठ, पर्वती, नवी पेठ, पर्वती दर्शन, कोंढवा, सहकारनगर, आंबिल ओढा वसाहत या परिसरात हे राहणारे होते. त्यातील बहुतांश व्यक्तींना जुने आजार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.