‘करोना पूर्णपणे आटोक्यात!’ या राज्याने लॉकडाऊन पूर्णपणे हटवला…

हैदराबाद – करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट देशासाठी अत्यंत घातक ठरली. विषाणू संसर्गाचा प्रचंड वेग असलेल्या या लाटेमध्ये रुग्ण संख्येचा अक्षरशः विस्फोट झाला होता. दररोज लाखो रुग्ण वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था तोकडी पडत होती. यातूनच अनेकांना आपले जीव गमवावे लागले. मात्र दुसऱ्या लाटेचा वेग आता काहीसा मंदावला असून जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येत आहे.

पहिल्या लाटेनंतर शिथिल करण्यात आलेले निर्बंध, सरकार व नागरिकांकडून करोना सुरक्षिततेच्या नियमांकडे झालेले दुर्लक्ष यांमुळेच विषाणूचा प्रसार वेगाने होण्यास मदत झाली. मात्र आता दुसरी लाट ओसरत असताना ही चूक पुन्हा होऊ नये याकडे राज्य सरकारांकडून विशेष लक्ष देण्यात आलंय.

परंतु तेलंगणा मात्र याला अपवाद ठरलं आहे. तेलंगणा सरकारने आज राज्यातील लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊन हटवण्याबाबत राज्य सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या आदेशांमध्ये, “तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर राज्यातील लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्यात आला आहे. करोना रुग्णांची संख्या, कमी झालेला पॉझिटिव्हिटी रेट हे करोना पूर्णपणे आटोक्यात आल्याचं दर्शवतात.” असं स्पष्ट करण्यात आलंय.

दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध पूर्णपणे हटवले जाणार आहेत. तेलंगणामध्ये शुक्रवारी करोना विषाणू संसर्ग झालेले १४१७ रुग्ण आढळले होते. तर १२ मृत्त्यू व १८९७ जण विषाणू संसर्गातून मुक्त झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.