पिंपरी – महाराष्ट्र ही संतांची भूमी असण्यासोबतच सुसंस्कृत असे पुरोगामी राज्य आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून जाणिवपूर्वक सातत्याने राज्यातील महापुरूषांचा अवमान केला जात आहे. आता तर विरोधी पक्षातील नेत्यांचाही अपमान भाजपचे आमदार करत आहेत. महागाई, बेरोजगारी या ज्वलंत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधाने करण्याचा भाजप नेत्यांचा डाव आहे. आमच्या नेत्यांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला.
शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबद्दल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह असे विधान केले होते. याच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादीच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शुक्रवार (दि.13) रोजी शहराध्यक्ष गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या आंदोलनात सहभागी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून पिंपरीतील आंबेडकर चौक दणाणून सोडला. “हल्लाबोल हल्लाबोल नितेश राणे हल्लाबोल… चप्पल लेके हल्लाबोल, पत्थर लेके हल्लाबोल… दंडा लेके हल्लाबोल..’ “माफी मागो माफी मागो नितेश राणे माफी मागो…’ अशी घोषणाबाजी करून यावेळी तीव्र निषेध नोंदविण्यात आला. शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह माजी महापौर संजोग वाघेरे, युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला शहर अध्यक्षा कविता आल्हाट यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.