मुंबई – प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला होता. रस्ता ओलांडताना दुचाकीने जोरात धडक दिल्याने बच्चू कडू यांचा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला आहे. मात्र, सुदैवाने बच्चू कडू या अपघातातून बचावले आहेत. त्यांना अमरावतीतून नागपुरातील एका रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, नागपुरात बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांच्या भेटीला एक दिव्यांग तरूण आल्याचे पाहायला मिळाले. अपघातग्रस्त बच्चू कडूंची दिव्यांगाने भेट घेतल्यानंतर बच्चू कडू देखील भारवून गेले. सागर मेश्राम असे या तरूणाचे नाव असून बच्चू कडू यांनी या तरूणासह झालेल्या भेटीचा आणि संवादाचा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या त्यांचा हा विडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, सर्वत्र याच व्हिडिओची चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
बच्चू कडू हे आज पहाटे 6 ते 6.30 च्या दरम्यान रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी सुस्साट वेगात आलेल्या दुचाकीने बच्चू कडू यांना जोरदार धडक दिली. दुचाकीस्वाराने धडक दिल्याने बच्चू कडू हे रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला. डोक्याला मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.